औरंगाबाद: चाळीस दिवसांच्या उन्हाळी सुट्यानंतर आज मनपा, जिल्हा परिषद, खासगी शाळांच्या सुट्या संपल्या अन बंद असलेल्या शाळांची दारे उघडली. आजपासून पुन्हा शाळेतील घंटाचा आवाज ऐकू यायला लागला. शाळा सुरू होताच पहिल्या दिवशी मुलांनी मोठ्या संख्येने शाळेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. तर काही शाळांमध्ये मुलांना फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
गेले पंधरा दिवसांपासून पालकवर्ग मुलांच्या शाळेची तयारी करीत होते. तयारी पूर्ण करून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीवर्गही सज्ज झाले होते. आजपासून सर्वत्र शाळा सुरू होताच मुलांनी सकाळीच शाळेत पाऊल ठेवले. घंटेचा आवाजही सर्वत्र शहरात ऐकू आला. राष्ट्रगीत, प्राथनेने सुरुवात झाली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही हजेरी लावली. यावेळी काही शाळांमध्ये पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना समग्र (सर्व) शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. तसेच शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागतही केले.
शाळांमध्ये स्वागतगीत म्हणून नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्यानुसार सर्वत्र पुस्तके वाटप करण्यात आले. यात औरंगाबाद जिल्हा मनपाअंतर्गत शाळांना 7 लाख 69 हजार 803 तर जिल्हा परिषदेच्या शाळेत 19 लाख 28 हजार 39 हून अधिक मोफत पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.